केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- आंतरराष्ट्रीय पातळीवर खतासाठी लागणाऱ्या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली, तरीही डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी १४ हजार ७७५ कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या जुन्याच भावाने हे रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी घेतला.

या निर्णयाबद्दल भाजप व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया आमदार बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केली.

पाचपुते यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रासायनिक खतांसाठी आणखी १४ हजार ७७५ कोटींचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे डीएपी खतासाठीची सबसिडी १४० टक्के वाढली असून आता शेतकऱ्यांना डीएपी खताची गोणी गेल्या वर्षीच्या म्हणजे १२०० रुपये भावाने मिळेल.

नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याच पद्धतीने आजचा स्वागतार्ह निर्णय आहे, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतासाठी लागणाऱ्या फॉस्फरिक ॲसिड, अमोनिया या रसायनांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे खत कंपन्यांनी भारतात रासायनिक खताच्या किंमतीत वाढ केली. परंतु, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना हा खताच्या किंमतीचा वाढीव बोजा झेपणारा नव्हता.

खतांच्या किंमती परवडण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने अनुदान द्यावे, अशी विनंती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय खते व रसायने मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्या पार्श्वभूमीवर झालेला निर्णय स्वागतार्ह आहे.