आगामी १० दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे : आरोग्यमंत्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- महाराष्ट्राला आता म्युकरमायकोसिस या अाजाराने घेरले आहे. राज्यात म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत.

हा साठा ३१ मेनंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे असणार आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. म्युकरमायकोसिस आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून उचलल्या जाणाऱ्या पावलांविषयी ते प्रसारमाध्यमांना माहिती देत होते.

टोपे म्हणाले, पुढचे १० दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये औषधांचा, इंजेक्शनचा कसा पुरवठा होईल, ते महत्त्वाचे ठरणार आहेत. मी स्वत: केंद्र सरकारच्या संबंधित विभागांशी बोललो आहे.

याचा कच्चा माल साराभाई कंपनीकडून घेऊन आपण वर्धा आणि पालघरमधल्या उत्पादकांना देऊन हे इंजेक्शन बनवून घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी २ किलो कच्चा माल पुरवण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. एका किलोमध्ये २० हजार इंजेक्शन तयार होतात.

त्या माध्यमातूनही इंजेक्शन मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे. दरम्यान, यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोणतंही रेशनकार्ड असणाऱ्या व्यक्तींना म्युकरमायकोसिसवरचे मोफत उपचार मिळतील, असे देखील टोपे यांनी स्पष्ट केलं.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ज्यांच्याकडे कुठलंही रेशनकार्ड आहे, त्यांना या आजारावरचा उपचार मोफत मिळणार आहे. इएनटी, डेंटिस्ट, ऑप्थोमोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, प्लॅस्टिक सर्जन असे लागतात. या सर्जरी या आजारासाठी कराव्या लागतात.

या योजनेतून प्रत्येकाच्या कुटुंबाला दीड लाख रुपयांचा कव्हर मिळतो. पण राज्य सरकारने जो काही खर्च उपचाराला येईल, त्याची व्यवस्था केली आहे , असे ते म्हणाले. म्युकरमायकोसिसवर आवश्यक असणाऱ्या उपचारांची आणि त्यांच्या उपलब्धतेविषयी देखील राजेश टोपे यांनी यावेळी माहिती दिली.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी दररोज १०० इंजेक्शन लागतात. पुढे दर आठवड्याला ५०० च्या आसपास रुग्ण वाढणार आहेत. या क्षणाला आपल्याला दीड ते दोन लाख इंजेक्शन हवे आहेत. त्यासाठी १ लाख ९० हजार इंजेक्शन्सची ऑर्डर देखील आपण दिली आहेत.

तिचे पैसे देखील आपणच देणार आहोत. पण त्याचं वाटप कसं करायचं, हे केंद्राच्या हातात आहे. जशी रेमडेसिविरला एक स्थिरता आली आहे, तशी या बाबतीत ३१ मेनंतर इंजेक्शनची उपलब्धता होईल. त्यामुळे पुढचे १० दिवस अडचणीचे आहेत.