राज्य सरकारकडून मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल केले होते.

ते मागे घेण्याची मागणी करण्यात येत असताना राज्य सरकारने आता मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले सरसकट सर्व गुन्हे मागे घेतले आहे. सरकारच्या निर्ययाने खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी मूक मोर्चांवर भर दिला होता. तर काही मोर्चांना आणि मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळणही लागले होते.

त्यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची सातत्याने मागणी होत होती.

स्वत: खासदार संभाजी छत्रपती यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या पूर्वीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती.

आज अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली असून, या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर मराठा तरुणांनीही संभाजी छत्रपती यांचे आभार मानले.