लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नाव काय राहणार ? केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे तसेच अहमदनगरचे नामांतरण व्हावे हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून नगरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतं आहे. दरम्यान जिल्हा विभाजनाचा मुद्दा अजून तसाच असला तरी देखील नामांतरणाच्या मुद्द्यावर वर्तमान शिंदे सरकारने सकारात्मक निर्णय घेतलेला आहे.

अहमदनगर शहरासह जिल्ह्याचे नामांतरण करण्याचा निर्णय 13 मार्च 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आता अहमदनगरला ‘अहिल्यादेवीनगर’ असे नवीन नाव मिळाले आहे. विशेष बाब अशी की, राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर गुगल मॅपवर अहमदनगरचे नाव अहिल्यादेवीनगर असे झळकले आहे.

तथापि, अहमदनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अजूनही अहिल्यादेवीनगर हे नाव पाहायला मिळालेले नाही. यामुळे शहरवासियांच्या माध्यमातून अहमदनगर पालिका केव्हा अहिल्यादेवी नगर हे नाव वापरणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.

याशिवाय नागरिकांच्या माध्यमातून यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नाव काय राहणार ? हा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता. निवडणुक आयोग अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी नवीन ‘अहिल्यादेवीनगर’ नावाचा वापर करणार का ? असा प्रश्न नुकत्याच झालेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत देखील विचारला गेला होता.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव भैरवनाथ वाकळे यांनी यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नाव काय राहणार असा प्रश्न विचारला.

यावर उत्तर देताना निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नाव निवडणुकीत बदलणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. नामांतरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने लोकसभा मतदारसंघाचे जुनेच नाव वापरले जाणार असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. खरेतर अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

यानंतर महापालिकेने देखील याचा ठराव मंजूर केला होता. तसेच हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे पाठवण्यात आला होता. यानंतर 13 मार्च 2024 ला राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीत अहमदनगर शहरासह जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मागणी करताना आणि महापालिकेने ठराव करताना अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करण्याचे सुचवले होते. मात्र शासकीय कामकाजांसाठी साधे आणि सोपे नाव असावे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण करण्याऐवजी अहिल्यादेवी नगर असे नाव ठेवण्यात आले आहे.

दरम्यान सरकारने हा निर्णय आगामी निवडणुकीत फायदा घेण्यासाठी घेतला असल्याचा आरोप विरोधकांच्या माध्यमातून केला जात आहे. तथापि यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभा मतदार संघाचे जुनेच नाव वापरले जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असतानाही त्या लोकसभा मतदारसंघात देखील जुनेच नाव वापरले जाणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.