ठाकरे गटाला मोठा धक्का; सेनेच्या १५ खासदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील ५५ पैकी तब्बल ४० आमदारांच्या साथीने बंड पुकारले आणि या सर्वांच्या बंडखोरीमुळे राज्यात नवा सत्ताबदल झाला. या बंडखोरीने हैराण झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांसह बंड करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. तसेच वेगवेगळ्या महानगरपालिकांतील नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचत शिंदे यांनी ठाकरेंना तगड आव्हान दिले आहे. त्यातच आता खासदारांनाही आपल्या गटात सामिल करुन घेण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

बुधवारी रात्री शिवसेनेचे १८ पैकी तब्बल १५ खासदार एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. या खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिल्यास उद्धव ठाकरे यांची आगामी राजकीय वाटचाल आणखी खडतर होणार आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या १५ खासदारांच्या मुख्यमंत्र्याशी झालेल्या भेटीनंतर खासदार एकनाथ शिंदे गटात सामिल होणार का?  या १५ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर शिवसेनेच्या ठाकरे गटाची काय भूमिका असेल?  हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.