शिंदेंची हौस तात्पुरती भागली; शिवसेनेचा खोचक टोला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : अनेक नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडी सरकार पाडून  शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. त्यावरु शिवसेनेमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये नव्या सरकारवर टीका केली आहे.  

भाजपाचा कुटिल डाव आहे. ज्यांना मुख्यमंत्रिपद हवं होतं, त्या एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागवली आहे. हे काही कायम स्वरूपी नाही. फक्त एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत गेलेले इतर ३९ आमदार गेल्यामुळे शिवसेनेचा मूळ ढाचा कुठेही ढासळलेला नाही. महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख हे आजही तेवढ्याच ताकदीने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे आहेत. महाराष्ट्रात एकट्या शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे व्यक्त करत आहेत, असे विनायक राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील सत्तानाट्यादरम्यान भाजपनं राज्यघटनेचा चोळामोळा करण्याचं पाप केलं. मी भाजपला इशारा देतोय, की घोडेबाजारात तुम्ही किती हजार कोटींची उधळपट्टी केली, हे सर्वच लोकांना माहिती झालं आहे. अशा प्रकारे पैशांचा वारेमाप वापर करून शिवसेना संपवण्याचा विचार जर तुम्ही करत असाल, तर तुमचा विचार फोल ठरेल. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तुम्ही विकत घेतले असतील. पण शिवसैनिक विकत घेण्याचा विचार तुम्ही कदापि करू नका. शिवसैनिक तुम्हाला गाडून टाकतील, असेही  विनायक राऊत म्हणाले आहेत.