ज्यांचं रक्त भगवं तो ठाकरेंसोबत; आदित्य ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदारांनी बंड केला आणि भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी निष्ठा यात्रेला सुरवात केली आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाला भेट देत आहेत. विरोधकांकडून बाकीचे आमदार देखील शिवसेनेला रामराम करतील असा दावा केला जात आहे. असा दावा करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी चांगलंच सुनावलं आहे.

आम्ही सगळीकडे फिरत आहोत. लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, ते जातील. पण मूळ नागरिक आहे, जो शिवसैनिक आहे. ज्यांचे रक्त भगवे आहे, ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला त्यांनी आम्हाला धोका दिला. कदाचित आमच्याकडून राजकारण कमी झाले असेल. समाजकारणात मात्र आम्ही कोठेही कमी पडलो नाही. ज्यांना परत शिवसेनेत यायचे असेल, त्यांना दरवाजे खुले आहेत. पण ज्यांना वाटत आहे की तिकडे त्यांचे भले होईल तर तिथेच थांबावे. ज्यांना दुसऱ्या पक्षात जायचे असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीसाठी लोकांसमोर यावे. जनता जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.