12वी पास शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! फुलशेतीतुन साधली आर्थिक प्रगती; ‘या’ फुलांची चार एकरात लागवड करून कमवलेत 7 लाख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करणे आता जरुरीचे बनले आहे. विशेष बाब म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांनी ही बाब हेरली असून आता वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधव शेती व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहेत. वास्तविक, शेती व्यवसायात सातत्याने निसर्गाच्या लहरीरीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

अतिवृष्टी अवकाळी गारपीट ढगाळ हवामान यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पादन मिळत आहे. शिवाय उत्पादित केलेल्या शेतमालाला अनेकदा बाजारात अपेक्षित असा दर देखील मिळत नाही. विशेषता पारंपारिक पिकांच्या शेतीत शेतकऱ्यांना या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सध्या स्थितीला बाजारात सोयाबीन कांदा कापूस या पारंपारिक पिकांची शेती शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा व्यवहार सिद्ध होत आहे.

यामुळे नवयुवक तरुणांचा शेतीपासून मोहभंग होत आहे. शेती ऐवजी कंपनीत बारा तास काम केलेलं बरं असं आता नवयुवक बोलू लागले आहेत. मात्र, या संकटावर काही शेतकऱ्यांनी यशस्वी मात केली आहे. हिंगोली जिल्ह्यातही एका तरुण शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या पुढ्यात येणारी ही संकटे यशस्वीरित्या झेलून लाखोंची कमाई करत शेतीमध्ये यश गवसल आहे. जिल्ह्यातील तालुका औंढा नागनाथ येथील मौजे लाख गावी एका तरुण शेतकऱ्याने फुलशेतीच्या माध्यमातून लाखोंची कमाई करत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.

कैलास गणेशराव वानखडे असं तरुण शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आपल्या चार एकर शेत जमिनीत विविध फुलांची लागवड करून तब्बल सात लाखांचा निव्वळ नफा कमवला आहे. कैलास यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत फुलशेतीस सुरुवात केली. सुरुवातीला फुलशेतीचा प्रयोग त्यांच्यासाठी नवखा होता. अशा परिस्थितीत फुलशेती यशस्वी करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक काम होतं. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी आव्हान पेलून कायमच आपल्या प्रयोगाचे वेगळेपण जपत असतात.

कैलास यांनी देखील असंच काहीसं केलं असून आव्हान स्वीकारत फुलशेतीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणल आहे. कैलास यांच्याकडे वडिलोपार्जित 12 एकर शेत जमीन आहे. मात्र तरीदेखील पारंपारिक पिकांच्या शेतीतून त्यांना अधिकची शेतजमीन असूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं. परिणामी त्यांनी शेतीमध्ये नवीन काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी आपल्या चार एकर शेत जमिनीवर फुल शेती करू असं ठरवलं.

मग काय त्यांनी आपल्या चार एकर शेत जमिनीत एका एकरावर गुलाबाची आणि उर्वरित तीन एकरावर असपेरा, ब्ल्यु डीजी, गलांडा, कलर अष्टर, गोल्डन बुके या फुलांची लागवड केली. गुलाबाची एका एकरात शेती करण्याचे कारण म्हणजे गुलाबाला बारामती बाजारात मागणी असते शिवाय दरही चांगला मिळतो. हेच कारण आहे की गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात. कैलास यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलशेतीत यशस्वी होण्यासाठी फुलांची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी लागते व्यवस्थापनासाठी अधिकचा खर्चही करावा लागतो.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते दर आठ दिवसांनी फुलांच्या रोपांवर बुरशीनाशक आणि कीटकनाशक फवारत असतात. तसेच फुल शेतीमध्ये फ्लड पद्धतीने पाणी भरून चांगले उत्पादन मिळवता येत नाही. त्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. कैलास यांनी देखील ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापनाचे काम केले परिणामी पाण्याचा अपव्यय टाळण्यास मदत झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चार एकरात फुलवलेली फुलांची बाग कैलास यांच्यासाठी वरदान ठरली असून या चार एकरात खर्च वजा जाता त्यांना पाच ते सात लाखांच निव्वळ उत्पन्न मिळणार आहे.

येत्या काही दिवसात कैलास यांना फुल शेती मध्ये अजून आधुनिक प्रयोगाचा अवलंब करायचा आहे. कैलास यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण केलं बारावीनंतर शेतीकडे करिअर म्हणून त्यांनी पाहीले. सुरुवातीला पारंपारिक पिकांच्या शेतीत त्यांना तोटा आला. त्यामुळे त्यांनी फुल शेतीचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला गलांडा फुलाची शेती केली. त्यानंतर बाजारपेठेचा आढावा घेत गुलाबाची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर बाजारात इतरही फुलांची मागणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले या पार्श्वभूमीवर त्यांनी इतरही फुलाची शेती करण्यास सुरुवात केली.

भविष्यात त्यांना पॉलिहाऊस मध्ये फुलशेती सुरू करायची आहे. त्यासाठी शासकीय योजनेचा लाभ घेण्याचा त्यांचा विचार आहे. निश्चितच कैलास यांनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे. कैलास यांच्या प्रयोगाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे राज्यासह देशात असे अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत जे पुरुष शेती करत आहेत. हे प्रयोगशील शेतकरी पॉलिहाऊस सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फुल शेती करत आहेत. मात्र अनेकदा पॉलिहाऊस मध्ये देखील फुलशेतीतून त्यांना अपेक्षित उत्पादन प्राप्त करता येत नाही. परंतु कैलास यांनी खुल्या रानात केलेला हा हटके प्रयोग इतरांना विचारात पाडणारा आहे.