कौतुकास्पद! फक्त 30 गुंठ्यात भात अन भाजीपाला पिकाची केली लागवड, झाली लाखोंची कमाई; सेंद्रिय शेतीचा हा प्रयोग शेतकऱ्यांना पाडतोय भुरळ

Ajay Patil
Published:
organic farming

Organic Farming : गेल्या काही दशकांपासून शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात रासायनिक खतामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळण्यास मदत झाली. मात्र, रासायनिक खतांचा संतुलित वापर होणे गरजेचे होते. पण शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर सुरू केला.

परिणामी शेत जमिनीची सुपीकता कमी झाली यामुळे पिकाची उत्पादकताही घटली. म्हणून आता शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे हेतू शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. विशेष बाब अशी की शेतकरी बांधव देखील आता रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर केल्यामुळे फायदे कमी आणि दुष्परिणाम अधिक होतात हे समजून चुकले आहेत.

यामुळे अलीकडील काही वर्षात सेंद्रिय शेतीचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांना आता चांगले उत्पादन देखील मिळू लागले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातही सेंद्रिय शेतीचा असाच एक नवीन प्रयोग एका प्रयोगशील शेतकऱ्याने केला असून या शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीमध्ये चांगले यश संपादित करता आले आहे. त्यामुळे पंचक्रोशीत या प्रयोगाची सध्या चर्चा असून इतर प्रयोगशील शेतकरीही सेंद्रिय शेतीकडे आकृष्ट होत आहेत.

शहापूर तालुक्यातील मौजे किनवली गावातील गुरुनाथ शिवराम उबाळे यांनी आपल्या 30 गुंठे शेतजमीनीत हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला आहे. उबाळे यांनी आपल्या गावालगत असलेल्या 30 गुंठे जमिनीत भात या पारंपारिक पिकांची सेंद्रिय पद्धतीने शेती केली आहे. याशिवाय त्यांनी या क्षेत्रात वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची देखील लागवड करून दाखवली आहे. विशेष म्हणजे भाजीपाला लागवड देखील पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली असून यातून त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत आहे.

सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीची सुपीकता पुन्हा एकदा वाढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असून पंचक्रोशीत इतरही शेतकरी उबाळे यांच्याप्रमाणे सेंद्रिय शेतीची कास धरू लागले आहेत. भातव्यतिरिक्त उबाळे यांनी आपल्या 30 गुंठे जमिनीत काकडी, भेंडी, ढोबळी मिरची, मिरची, भोपळा, कारली या भाजीपाला म्हणजेच तरकारी पिकाची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आहे. या पिकांच्या उत्पादनासाठी रासायनिक खतांचा बिलकुल ही वापर त्यांनी केलेला नाही.

परिणामी त्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाल्याला आणि भात पिकाला बाजारात मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. गुरुनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सितारा आणि सीजन या दोन मिरचीच्या जातीची त्यांनी आपल्या क्षेत्रात लागवड केली आहे. मिरचीची लागवड केल्यानंतर पिकाच्या पोषणासाठी त्यांनी रासायनिक खतांचा बिलकुलचं वापर केलेला नसून सेंद्रिय खताचा पिकाच्या वाढीसाठी वापर करण्यात आला आहे. शेण मलमूत्र यांच्यापासून तयार करण्यात आलेले जीवामृत पिकाच्या पोषणासाठी त्यांनी वापरले.

मिरचीच्या पिकावर रोगांचा किंवा कीटकांचा प्रादुर्भाव झाला की दहा झाडांच्या पानाचा दशपर्णी अर्क त्यांनी पिकावर फवारले आहे. यामुळे रोगाचा आणि कीटकांचा समूळ नाश होत असल्याचा त्यांचा दावा आहे. याशिवाय त्यांनी शेणखत, कुजलेला पालापाचोळा पीक वाढीसाठी वापरले आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने मिरची लागवड केलेली असतानाही अवघ्या 46 दिवसात मिरचीचे पीक फुलोऱ्यावर आले. साधारणपणे मिरचीचे पीक 48 दिवसात फुलोरा अवस्थेत येत असते. मात्र उबाळे यांचा मिरची पीक रासायनिक खता विरहित लवकर फुलोरा अवस्थेत आले आहे.

विशेष म्हणजे मिरचीच्या पिकाला फळधारणा चांगली झाली आहे. यामुळे उत्पादनही चांगलं मिळणार आहे. सेंद्रिय पद्धतीने गुरुनाथ शेती करत असल्याने उत्पादन खर्च खूपच कमी येतो. गेल्या वर्षी भात पिकाचीं देखील सेंद्रिय पद्धतीने त्यांनी शेती केली त्यातूनही त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. गुरुनाथ यांनी उत्पादित केलेला भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला असल्याने बाजारात याला मोठी मागणी आहे. स्थानिक बाजारात ते आपला भाजीपाला विक्री करत आहेत. यामुळे त्यांना चांगले उत्पादन मिळत असून त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील इतरही शेतकरी त्यांच्या बांधावर हजेरी लावत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe