लई भारी बाजीराव ! एका एकरात कलिंगड पिकाची शेती सुरू केली; मिळवले 25 टन उत्पादन, झाली 2 लाखांची कमाई, पहा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story : परभणी जिल्ह्यातील शेतकरी कायमच वेगवेगळे प्रयोग करत असतात. नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांनी आपला वेगळेपण सिद्ध केलं आहे. दरम्यान जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातही असाच एक नवीन प्रयोग पाहायला मिळत आहे. तालुक्यातील मौजे बोरगव्हाण येथील प्रगतिशील शेतकरी बाजीराव खुडे गेल्या काही वर्षांपासून मिरचीची शेती करत आहेत. बाजारपेठेचा अंदाज बांधत त्यांनी मिरचीची लागवड सुरू केली आहे. यातून त्यांना चांगली कमाई देखील होत आहे.

यंदा मात्र त्यांनी मिरची पिकासोबतच कलिंगड हंगामी पिकाची देखील शेती सुरू केली आहे. कलिंगडची लागवड मात्र त्यांनी मुख्य शेतात न करता मिरचीच्या पिकातच आंतरपीक म्हणून कलिंगड पीक उत्पादित केले आहे. विशेष बाब म्हणजे एका एकरात केलेली ही लागवड त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली असून यातून त्यांना 25 टन उच्च प्रतीच्या टरबुजचे उत्पादन मिळाले असून 2 लाख 20 हजार रुपयांच उत्पन्न मिळालं आहे. यामुळे सध्या बाजीराव यांचा हा प्रयोग पंचक्रोशीत चर्चेचा विषय आहे.

बाजीराव यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जानेवारी महिन्यात मिरचीच्या पिकात आंतरपीक म्हणून कलिंगड लागवड केली. मिरची आणि कलिंगडच्या पिकाला योग्य पद्धतीने संतुलित मात्रात खत व्यवस्थापन केले. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन केले. तसेच मल्चिंग केल्यामुळे पाण्याची ही बचत झाली. मावा तुडतुडे यासारख्या कीटक व्यवस्थापनासाठी फवारणी देखील करण्यात आली. तसेच त्यांनी कामगंध सापळ्यांचा देखील वापर केला होता. यामुळे कीटक नियंत्रणात मदत झाली. कलिंगड आणि मिरची पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना चांगला नफा मिळाला आहे.

बाजीराव सांगतात की लागवडीनंतर मात्र 75 दिवसात त्यांना कलिंगडचे उत्पादन मिळाले. एका एकरात कलिंगडच्या पिकातून त्यांना दोन लाख वीस हजार रुपये उत्पन्न मिळाले असून खर्च वजा जाता एक लाख 80 हजार रुपयाचा निव्वळ नफा त्यांना राहिला आहे.

विशेष म्हणजे आता मिरचीचे देखील उत्पादन मिळत असून येत्या काही दिवसात याही पिकातून त्यांना चांगली कमाई होण्याची आशा आहे. निश्चितच परभणी जिल्ह्यातील या प्रगतिशील शेतकऱ्याने शेतीमध्ये हंगामी पिकाच्या लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.