प्रयोगशील शेतकरी दांपत्याचा अभिनव प्रयोग; दुष्काळी भागात फुलवली केळीचीं बाग, दीड एकरात झाली 3 लाखांची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. अगदी दुष्काळी भागात देखील राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. आज आपण अशाच एका शेतकरी दांपत्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण भटकावे लागत होते त्या ठिकाणी आपल्या योग्य नियोजनाच्या माध्यमातून केळीची बाग फुलवत लाखों रुपयांची कमाई केली आहे.

केळीची बाग फुलवली एवढे नाही तर त्यांनी उत्पादित केलेली केळी थेट दुबईच्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. यामुळे सध्या या शेतकरी दांपत्याचा हा प्रयोग महाराष्ट्रभर चर्चीला जात आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याच्या मौजे टाका येथील व्यंकट शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती मेघा वेंकट शिंदे यांनी ही किमया साधली आहे.

या शेतकरी दांपत्याने आपल्या दीड एकर शेत जमिनीवर फुलवलेल्या केळीच्या माध्यमातून तब्बल तीन लाख रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील केळी शेतीमधील बारकावे समजावत परिसरातील 40 एकर क्षेत्र हे केळी लागवडीखाली आणल आहे. यामुळे या शेतकरी दांपत्याचा हा प्रयोग अनेकांसाठी आदर्शवत ठरणारां आहे. शिंदे कुटुंबांकडे एकूण सहा एकर 20 गुंठे शेतजमीन आहे.

दुष्काळी पट्ट्यात जमीन असल्याने मात्र अपेक्षित असं त्यांना उत्पन्न मिळत नव्हतं. अशातच केळी लागवडीची त्यांना कल्पना सुचली. खरं पाहता उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा काठावर त्यांच्या पाहुण्यांची शेत जमीन आहे. त्या ठिकाणी त्यांचे पाहुणे केळी या पिकाचे प्रामुख्याने शेती करतात. यामुळे आपणही केळी पिकाची लागवड करायची असा निर्धार त्यांनी मनोमनी केला. केळी लागवडीसाठी ज्यावेळी त्यांनी सुरुवात केली तेव्हा अनेकांनी आपल्या भागात केळीची शेती होणे अशक्य असल्याचे सांगितले.

मात्र निश्चयाचा महामेरू आणि स्वभावाने जिद्दी वेंकट यांनी केळीची लागवड करायचीच असं ठरवलं. या अनुषंगाने त्यांनी 16 रुपये प्रमाणे केळीचीं रोप आणली. दीड एकरासाठी 1800 केळी रोपांची त्यांनी लागवड केली. दीड एकर क्षेत्रावर केळी लागवडीपासून ते काढणीपर्यंत एक लाख रुपयांचा त्यांना खर्च आला. दुष्काळी भाग असल्याने पाणी व्यवस्थापन करताना मात्र त्यांनी विशेष काळजी घेतली.

ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून केळी पिकाला पाणी देण्यात आले. नुकतेच गेल्या आठवड्यात कळंब येथील व्यापाऱ्याच्या माध्यमातून शेतकरी दाम्पत्यांनी उत्पादित केलेली केळी थेट दुबईच्या बाजारात विक्रीला गेली. वीस हजार रुपये प्रति टन असा दर त्यांच्या केळीला मिळाला असून त्यांना यातून तीन लाख रुपयांची कमाई झाली आहे.

विशेष बाब म्हणजे केळी लागवड त्यांच्यासाठी तर फायद्याचे ठरलेच, मात्र दुष्काळी भाग असतानाही योग्य नियोजन आखलं तर आपल्या भागात केळीची लागवड यशस्वी होऊ शकते असं शेतकऱ्यांना पटलं असल्याने परिसरात इतर प्रयोगशील शेतकऱ्यांनी देखील केळी पिकाची लागवड अलीकडे सुरू केली आहे. निश्चितच या शेतकरी दांपत्याने केलेला हा प्रयोग इतरांसाठी प्रेरक राहणार आहे.