Ahmednagar News : मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील खर्डा शहराजवळ मोटारसायकल व एसटीबसचा अपघात होवून यात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. याबाबत खर्डा पोलिसांनी बसचालकाची फिर्याद घेऊन जखमी झालेल्या तरूणावरच गुन्हा दाखल केला.

त्यामुळे बसचालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून जामखेड खर्डा हैदराबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जमावाने एसटीबसवर दगडफेक केली.

याबाबत माहिती अशी की, दि.२७ डिसेंबर रोजी दुपारी खर्डा शहराजवळ जुपिटर मोटरसायकल व पुणे कळंब या एसटीच्या अपघातात सोनू अनिल काळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर संदीप लहू पवार हा जखमी झाला असून

त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, दरम्यान गुरूवारी मृत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान खर्डा पोलिसांनी बसचालकाची फिर्याद घेऊन जखमी झालेल्या सोनू पवार याच्यावरच गुन्हा दाखल केला होता.

त्यामुळे समाज संतप्त झाला त्यानंतर जमावाने दगडफेक केल्याने पुणे कळंब या एसटी बसच्या काचा फुटल्या सुदैवाने या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. नंतर सदरचा जमावाने मृतदेह शिर्डी, हैदराबाद राज्य मार्गावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रॅफिक जाम झाली होती.

याबाबत माहिती मिळताच खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जमाव शांत करण्याचा प्रयन्त केला. अपघातग्रस्त एसटी चालकावरदेखील गुन्हा दाखल करावा व आमच्या मुलावर केलेला गुन्हा मागे घ्यावा,

अशी मागणी मृत तरूणाच्या नातेवाईकांनी केली. दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. सदरचा जमाव ऐकत नसल्याचे पाहून जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे पोलिसांची जागा कुमक घेऊन खर्डा येथे आंदोलनस्थळी पोहोचले.

त्यावेळी त्यांनी संतप्त जमावच्या तीव्र भावना ऐकून घेतल्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अपघात केलेल्या एसटी बसचा चालक अमोल अंकुश पांढरे याच्यावर खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

त्यावेळी या समाजातील काही तरुणांनी पोलिसांचे सर्व म्हणणे ऐकून घेत बसचालक पांढरे याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर जमाव शांत होऊन रस्त्याच्या बाजूला झाला व अपघातात मृत्यू झालेल्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाणकर यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

पोलिसांवर नामुष्कीची वेळ

मोटारसायकल व एसटी बसचा अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू व दुसरा गंभीर जखमी झाला. याबाबत खर्डा पोलिसांनी एसटी बस चालकाची फिर्याद घेऊन जखमी तरुणावरच गुन्हा दाखल केल्याने संबंधित समाज संतप्त झाला.

त्याचे पडसाद दगडफेक व रास्ता रोको आंदोलनात झाले. नंतर पोलिसांनी सदरचा गुन्हा मागे घेण्याचे आश्वासन देऊन बसचालकावर गुन्हा दाखल केल. त्यामुळे गुन्हा मागे घेण्याची पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली अशी चर्चा उपस्थितामध्ये चर्चिली गेली.