car travelled

Car Gadgets:- जेव्हा आपण कारने किंवा एखाद्या वाहनाने प्रवासाला निघतो तेव्हा प्रवास आनंददायी, विनाअडथळ्याचा आणि आरामशीर व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु प्रवास विनाअडथळ्याचा होण्यासाठी कारचे किंवा वाहनाचे खूप मोठे योगदान असते. जर कारने प्रवासामध्ये चांगली साथ दिली तर ठीक नाहीतर रस्त्यात काही समस्या वाहनांमध्ये निर्माण झाली तर प्रवासाला अडथळा येतोच परंतु आनंदावर देखील विरजण पडते.

त्यामुळे प्रवास करताना तुम्हाला काही अडचण येऊन प्रवास कंटाळवाणा होऊ नये किंवा काही समस्या उद्भवू नये त्यामुळे गाडीमध्ये काही गॅजेट्स आणि ॲक्सेसरीज असणे गरजेचे आहे. जेणेकरून संकट काळामध्ये किंवा समस्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करून तुमची समस्या मिटवू शकता.

 प्रवासाला निघताना गाडीत हे ॲक्सेसरीज ठेवा

1- टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम रस्त्यांवर जेवढे अपघात होतात त्यामध्ये होणाऱ्या अपघातांमधील जर आपण कारणांचा शोध घेतला तर बरेच अपघात वाहनाचे टायर फूटल्यामुळे होतात. कारण आताचे चकाचक रस्ते झाल्याने आपण वेगात प्रवास करतो.परंतु अशावेळी मात्र टायरच्या स्थितीकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो. टायरची कंडीशन कशी आहे किंवा त्यामध्ये हवेचा दाब किती आहे हे आपण तपासत नाही व आपल्या चुकीने अपघाताला निमंत्रण देऊन बसतो.

त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हवेचा दाब तपासने खूप गरजेचे आहे. टायरमधील जर हवेचा दाब तपासायचा असेल तर पंचर दुकानावर प्रत्येक वेळी जाणे शक्य नसतं. त्यामुळे आता बऱ्याच कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांच्या टॉप मॉडेलमध्ये किंवा लक्झरी सेगंमेंटच्या कारमध्ये टायर प्रेशर मॉनिटरची सिस्टम अगोदरच देऊन ठेवलेली आहे.

परंतु बऱ्याच गाड्यांमध्ये अजून देखील ही सुविधा नाही. तुमच्याही कारमध्ये अशी सुविधा नसेल तर तुम्ही टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम विकत घेऊन ठेवणे फायद्याचे आणि महत्त्वाचे ठरते. हे गॅझेट मधील जो काही व्हाल्व कॅप असते ती टायरवर दिलेल्या क्रमानुसार लावल्यानंतर मुख्य गॅजेट सुरू करावे लागते.

हे गॅझेट ब्लूटूथचा वापर करून काम करते व त्यामुळे ते ऑटो कनेक्ट होते व लगेच गॅजेटच्या डिस्प्लेवर आपल्याला  टायरमध्ये हवेचा दाब आणि तापमान देखील समजते व आपल्याला टायरमधील हवेचा दाब व त्याचे तापमान लक्षात आल्यामुळे आपण ते नियंत्रणात ठेवू शकतो. या गॅजेटचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सोलर पॅनलच्या साहाय्याने कार्यरत राहत असल्याने त्याला सतत चार्जिंग करण्याची गरज भासत नाही.

2- ओबीडी जीपीएस ट्रॅकर हे गॅजेट मोबाईल ॲप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असून गाडीचे लोकेशन काय आहे हे आपल्याला या माध्यमातून कळते. बऱ्याचदा आपली गाडी टो करून नेली जाते किंवा  गाडीमध्ये जर इमोबिलायझर सिस्टम असेल तर ती डीऍक्टिव्ह करून गाडी चोरण्याचा प्रयत्न होतो.

आपल्याकडे जर ओबीडी जीपीएस ट्रॅकर असेल तर या गॅजेटच्या मदतीने आपल्याला चोरीचा प्रयत्न समजू शकतो. याशिवाय गाडीचे एकूण स्थिती कशी आहे किंवा ड्रायव्हर गाडी कशी चालवत आहे किंवा एवरेज कमी जास्त होत आहे का इत्यादी गोष्टी देखील आपल्याला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून समजण्यास मदत होते.

3- पावर इन्वर्टर/ चार्जर या पावर इन्व्हर्टर किंवा चार्जरच्या साह्याने तुम्ही यूएसबीचा वापर करून मोबाईल किंवा इतर डिवाइस चार्ज करू शकतात. परंतु त्याशिवाय यामध्ये असलेल्या प्लग पॉईंटची मदत घेऊन तुम्ही मोठे डिवाइस म्हणजेच लॅपटॉप, कॅमेरा देखील वेगात चार्ज करू शकतात.

तसेच या पावर इन्वर्टर च्या डिस्प्लेवर व्होल्टेज दिसते व त्यामुळे किमान व्होल्टेज बॅटरी कडून मिळत असेल तर चार्जर ऑटोमॅटिक बंद होते व त्यामुळे ते अत्यंत सुरक्षित असून गाडीच्या बॅटरीवर देखील त्याचा विपरीत परिणाम होत नाही.

4- ब्लाइंड स्पॉट मिरर ड्रायव्हर गाडी चालवत असताना उजवी आणि डाव्या आरशांच्या साह्याने पाहत असतो. परंतु बऱ्याचदा वाहन चालकाच्या दृष्टीने काही स्पॉट असे असतात की ते त्याला दिसत नाही व डाव्या- उजव्या आरशामध्ये ब्लेंड स्पॉट मधील बऱ्याच गोष्टी चालकाला दिसत नाही व त्यामुळे काही गोष्टींचा अंदाज येण्यात ड्रायव्हरला अडचणी निर्माण होतात.

त्यामुळे गाडीमध्ये ब्लाइंड स्पॉट डिटेक्ट करण्याची सुविधा असणे खूप गरजेचे आहे व आता निवडक कंपन्यांनी त्यांच्या टॉप मॉडेल किंवा लक्झरी सेगमेंट मधील गाड्यांमध्ये ही सुविधा दिलेली आहे. ब्लेंड स्पॉट न दिसल्यामुळे बऱ्याचदा मोठे अपघात होण्याची शक्यता देखील असते.

त्यामुळे ब्लेंड स्पॉट मिरर हा अत्यंत उपयुक्त आणि स्वस्त असा पर्याय आहे. हे मिरर आकाराने छोटे असतात परंतु गाडीला असणाऱ्या आरशांच्या कोपऱ्यांवर ते चिकटवता येतात. व्यवस्थित ऍडजेस्ट केले की ब्लाइंड स्पॉट आपल्याला दिसू लागतात.

5- जम्पर केबल एखाद्या वेळेस जर रात्री घाटामध्ये गाडी बंद पडली किंवा बॅटरीच्या काही प्रॉब्लेम मुळे गाडी बंद झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. अशावेळी गाडीमध्ये जर जम्पर केबल असेल तर आपण तिचा वापर करून गाडी सुरू करू शकतो. ही केबल वापरायला अतिशय सोपी असते.

परंतु त्याकरिता आपल्याला रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या गाडीचे मदत घ्यावी लागते. जम्पर केबलचा वापर करून तुम्ही दुसऱ्या गाडीच्या बॅटरीतून करंट घेऊन आपली स्वतःची बंद झालेली गाडी सुरू करू शकतो. यामध्ये पॉझिटिव्ह आणि  निगेटिव्ह केबल बॅटरीला योग्य त्या ठिकाणी लावणे गरजेचे असते व त्यानंतर दुसरी गाडी सुरू करून साधारण एक मिनिटांनी आपली बंद पडलेली गाडी सुरू करावी.

सुरू झाल्यानंतर ती सुरू ठेवावी व त्यानंतर ही केबल काढावी. अशा पद्धतीने जर वाहन सुरू करायचे असेल तर डिझेल इंजिन असलेल्या गाडीला जास्त पावर लागते. त्यामुळे तुमची गाडी डिझेल इंजिनची असेल तर अशावेळी इतर वाहनाची मदत घेताना ते वाहन डिझेल इंजन असलेले असेल तर त्याकडून मदत घ्यावी.