Success Story : 1984 मध्ये 3000 भांडवलातून सुरू केला पोल्ट्री व्यवसाय! आज दिवसाला 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story :- कुठलाही व्यवसायाची सुरुवात करताना ती मोठ्या प्रमाणावर न करता ती एखाद्या छोट्याशा स्वरूपात करून कालांतराने त्यामध्ये प्रगती करत तो व्यवसाय विस्तारणे कधीही फायद्याचे असते. असं केल्यामुळे संबंधित व्यवसायातील खाचखळगे, नेमका कुठे काय निर्णय घ्यायचा तसेच इतर महत्त्वाच्या बाबी आपल्याला शिकता येतात  व जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर व्यवसायची सुरुवात करतात तेव्हा याच अनुभवाची शिदोरी कामाला येते.

छोट्याशा रोपट्यातून वटवृक्ष निर्माण होण्याकरिता ज्या पद्धतीने काम करावे लागते अगदी त्याच पद्धतीने व्यवसायाचे देखील असते. तसेच व्यवसाय उभारून एका रात्रीत कोणीही व्यवसाय यशस्वी करू शकत नाही किंवा त्या माध्यमातून श्रीमंत देखील होऊ शकत नाही.

त्याकरिता दीर्घकालापर्यंत तुमची जिद्द आणि कष्ट खूप महत्त्वाचे असतात व परिस्थितीनुसार व्यवसायामध्ये बदल करत जाणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. ही बाब जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर अमरावती जिल्ह्यातील मसाला अंजनगाव बारी रोड येथील शेतकरी रवींद्र मेटकर यांच्या उदाहरणावरून समजून घेता येईल.

 1984 मध्ये सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायाची अविश्वसनीय प्रगती

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मसाला अंजनगाव बारी रोड हे अमरावती जिल्ह्यातील गावातून या ठिकाणी रवींद्र माणिकराव मेटकर हे शेतकरी राहतात. कमवा आणि शिका या माध्यमातून त्यांनी रोजंदारी करत वाणिज्य शाखेत पदव्युत्तर  शिक्षण पूर्ण केले.

घरची एकंदरीत पार्श्वभूमी पाहिली तर वडील हे वनविभागांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. या सगळ्या कालावधीमध्ये रवींद्र मेटकर हे कुठल्यातरी व्यवसाय उभारावा या विचारात होते व त्या प्रयत्नातूनच त्यांनी 1984 मध्ये त्यांच्या वडिलांच्या जनरल प्रॉव्हिडंट फंड मधून तीन हजार रुपये काढले व या तीन हजाराच्या भांडवलावर राहत्या घराच्या गच्चीवरच 100 ब्रॉयलर कोंबड्या खरेदी करून व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.

त्यानंतर मेटकरी यांनी या व्यवसायात मागे वळून पाहिले नाही.त्यांची जर आपण पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात पाहिली तर ती खूप हळू गतीने केली असेच म्हणता येईल. 1984 मध्ये 100 कोंबड्यांपासून केलेली सुरुवात तब्बल दहा वर्षात त्यांनी 400 कोंबड्यांपर्यंत नेली.

 अशा पद्धतीने केली व्यवसायातील वाढ

शंभर कोंबड्यांपासून केलेली सुरुवात आणि आज प्रतिदिन साडेतीन लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करण्यापर्यंतचा प्रवास पाहिला तर तो खूप खडतर आणि रोमांचक आहे. 1994 मध्ये 400 कोंबड्यांपर्यंत नेलेला व्यवसाय त्यांनी वाढवण्याकरिता 1996 ला बँक ऑफ इंडिया कडून पाच लाखांचे कर्ज घेतले व  400 कोंबड्या असलेला हा व्यवसाय तब्बल 4000 कोंबड्यांवर नेला.

परंतु हा व्यवसाय कष्टाने उभा केला आणि सगळे व्यवस्थित सुरू असताना मात्र 2006 मध्ये संपूर्ण राज्यात बर्ड फ्लूने थैमान घातले व मिटकरी यांचा व्यवसाय देखील बुडण्यात जमा झाला. परंतु तरीदेखील न डगमगता व हार न मानता त्यांनी 2008 मध्ये पुन्हा बँक ऑफ इंडिया कडून 25 लाखांचे कर्ज घेतले व 20,000 अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला. या टप्प्यावरून मात्र त्यांनी व्यवसायाची गती पकडली ती कायम ठेवली.

आजमीतिला जर त्यांच्या शेड मधील कोंबड्यांची संख्या पाहिली तर ती तब्बल दीड लाख कोंबड्यांपर्यंत पोहोचली आहे. अंडे देणाऱ्या कोंबड्यांचे पालन केल्यामुळे आज त्यांचे शेडमधील अंडी उत्पादन पाहिले तर ते 90 हजार अंडी प्रतिदिन इतकी आहे.या अंड्यांची विक्री ते चार रुपये प्रति अंडे याप्रमाणे मध्यप्रदेश राज्यातील बैतूल तसेच इंदोर व खंडवा या ठिकाणी करतात तसेच इतर राज्यात देखील विक्री होते.

या हिशोबाने जर पकडले तर  90000 अंडी प्रति दिवस उत्पादनापासून चार रुपये प्रति अंडे याप्रमाणे तीन लाख साठ हजार रुपये प्रत्येक दिवसाला त्यांचे आर्थिक उत्पन्न आहे. या तीन लाख साठ हजार मधून जर प्रत्येक दिवसाचा खर्च वजा केला तर 60000 रुपये नफा शिल्लक राहतो.

 नफा वाढावा याकरिता खर्च कमी करण्यावर भर

या व्यवसायामध्ये त्यांनी नफा जास्तीत जास्त रहावा याकरिता अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च हा कोंबड्यांच्या खाद्यावर होत असतो. सध्या बाजारांमधील खाद्याचे दर पाहिले तर ते 24 रुपये प्रति किलो याप्रमाणे आहे.

परंतु मेटकर हे बाजारातून खाद्य खरेदी न करता ते स्वतः तयार करतात व त्याचा एकूण खर्च 20 रुपये प्रति किलो असा होतो. या दृष्टीने बाजारातून मिळणारे खाद्य आणि त्यांनी स्वतः तयार केलेले खाद्य यामधून ते दिवसाला 52 हजार रुपयांची बचत करतात. तसेच कोंबडी खत विकून देखील ते खूप मोठ्या प्रमाणावर नफा मिळवतात.

 पोल्ट्री बरोबर शेतीचे देखील आहे योग्य व्यवस्थापन

कुक्कुट पालन व्यवसाय बरोबर ते शेती देखील उत्तम करतात. त्यांच्याकडे एकूण 50 एकर शेती असून यामध्ये संत्रा, मोसंबी, चिकू, नारळ व केळी यासारखे फळबाग व दहा एकर क्षेत्रावर ते सेंद्रिय पद्धतीने कापूस लागवड करून पंधरा एकर प्रति एकरी कापसाचा उतारा मिळवण्यात देखील यशस्वी ठरले आहे.

शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळावे याकरिता ते  नेहमी कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभाग व इतर चांगले प्रयोगशील शेतकरी यांचे मार्गदर्शन घेतात व त्या पद्धतीने शेतीचे नियोजन करतात. शेती करत असताना ते पूरक एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करतात. एकच पीक न लागवड करता ते वेगवेगळ्या पद्धतीचे पिकांची लागवड करतात.

पुढे विपरीत नैसर्गिक परिस्थिती किंवा बाजारभावातील चढउतार अशा परिस्थितीमध्ये देखील ते उत्कृष्ट पद्धतीने आर्थिक उत्पन्न मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. शेतीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी यंत्रिकीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर दिला असून ते ट्रॅक्टर, पावर टिलर आणि फवारणी यंत्रांचा वापर करून मजुरांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत असून खर्च देखील वाचवत आहेत.

अशा पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसायात यश मिळवून शेती देखील उत्तम पद्धतीने करणारे मेटकर हे खरच इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श आहेत.