Insect Management : सोयाबीन पिकावर होत आहे ‘या’ अळीचा प्रादुर्भाव, वाचा या अळीचे स्वरूप आणि नियंत्रणाचे उपाय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Insect Management :- खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येत असलेले पीक म्हणजे सोयाबीन हे होय. सोयाबीन उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन गरजेचे असते. परंतु यामध्ये कीड व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो व गेल्या एक ते दोन वर्षापासून शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे नुकसान झाल्याची परिस्थिती उद्भवली होती.

यासोबतच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अळ्यादेखील सोयाबीनवर असतात. या सगळ्या किडींमध्येच अंगावर केस असलेली अळी म्हणजेच तिला आपण केसाळ अळी म्हणून देखील ओळखतो तिचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसून येत आहे. या अळीला शास्त्रीय भाषेत स्पिलोसोमा अळी असे देखील म्हणतात. त्यामुळे ही अळी नेमकी काय आहे? सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव होण्याची कारणे कोणती? आणि नियंत्रणाकरिता असलेल्या महत्त्वाच्या उपाययोजना याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 सोयाबीनवर दिसून येणारी केसाळ अळीचे स्वरूप

जर आपण मागच्या वर्षी मराठवाड्याचा विचार केला तर या ठिकाणी सोयाबीन पिकावर या किडीचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी दिसून आला होता. साधारणपणे सध्या सोयाबीनच्या लागवड क्षेत्रामध्ये झालेली वाढ, अनियमित पाऊस आणि  सोयाबीन पेरणीचा बदललेला वेळ सर्व कारणांमुळे देखील या किडीचा प्रादुर्भाव वाढताना सुद्धा दिसून येत आहे.

ही किड सोयाबीन पिकाच्या पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्यांच्या स्वरूपामध्ये अंडी घालते व या अंड्यातून ज्या काही अळ्या जन्म घेतात त्या पिवळ्या रंगाच्या दिसतात. परंतु जेव्हा याआळीची पूर्ण वाढ होते तेव्हा तिच्या अंगावर भरपूर प्रमाणात केस येतात.

साधारणपणे सोयाबीनच्या झाडाचा हिरवा भाग या अळ्या खातात व त्यामुळे पाने वाळतात. समजा जर या अळीचा प्रादुर्भाव खूपच जास्त झाला तर संपूर्ण पाने जाळी सारखे दिसतात व पानाच्या शिरा फक्त उरतात. त्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव किती झाला आहे त्या पद्धतीने उपाय योजना करणे गरजेचे असून योग्य पद्धतीने प्रभावी नियंत्रण करणे शक्य होते.

 अशा पद्धतीने करा नियंत्रण

प्रामुख्याने सूर्यफूल या तेलवर्गीय पिकावर आढळणारी ही अळी आता सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात दिसायला लागली आहे. या अनुषंगाने ज्या शेतामध्ये अगोदर जर सूर्यफूल पीक घेतले असेल तर त्या ठिकाणी शक्यतो सोयाबीन लागवड करूच नये. दुसरे महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही सोयाबीन लागवड कराल

किंवा सोयाबीन पेराल तेव्हा शेताच्या कडेच्या बाजूने सापळा पीक म्हणून सूर्यफुलाची पेरणी करून घ्यावी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतीचे जेवढे बांध आहेत ते स्वच्छ ठेवावेत. पिकाचे निरीक्षण करताना जर तुम्हाला सोयाबीनच्या पानांवर या अळीच्या अंडी दिसून आली तर ती पाने काढून नष्ट करून टाकावीत.

 रासायनिक नियंत्रणाचे उपाय

केसाळ अळीचे रासायनिक नियंत्रण करायचे असेल तर त्याकरिता क्वीनॉलफॉस 25 इसी 30 मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. परंतु जर या अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर इमामेक्टिन बेंजोएट 1.9 % इसी किंवा फ्लूबेंन्डामाईड 39.35 टक्के एससी तीन मिली किंवा इडोक्साकार्ब 15.8% इसी सात मिली यापैकी कोणत्याही एका कीडनाशकाचे प्रती 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करून घ्यावी. अशा पद्धतीने जर नियंत्रणाचे उपाय अवलंबले तर सोयाबीन पीक हे केसाळ अळीच्या प्रादुर्भावापासून मुक्त करता येते.