टाक्या घ्या फुल करून…पेट्रोल- डिझेल १५ ते २० रुपयांनी महाग होऊ शकतं

 

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News:- रशिया आणि युक्रेन युद्ध आता विध्वंसक वळणावर गेले असून त्याचा मोठा फटका कमॉडिटी बाजाराला बसला आहे. यामुळे कच्च्या तेलाचा भाव वाढला असून यामुळे भारतासाठी इंधन आयात महागली आहे.

जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरेल ९५ ते १२५ अमेरिकन डॉलर्स होण्याची शक्यता आहे. तसेच निवडणूक संपताच पेट्रोल – डिझेलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तथापि, उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होणारा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो, परंतु पूर्णपणे नाही.

सद्यस्थितीत, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के आयात करतो. इंधन दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा उत्पादक देश आहे. रशियावरील निर्बंधांमुळे जागतिक पुरवठा कमी होईल अशी भीती आहे. रशियावरील निर्बंधांमुळे पुरवठा कमी होण्याच्या भीतीमुळे इराणकडून येणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.