Pune Mhada Lottery Update: म्हाडाकडून पुण्यात सर्वात स्वस्त घर मिळवण्याची सुवर्णसंधी! वाचा कोणत्या ठिकाणी आहेत ही घरे व किती आहे त्यांची किंमत?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Mhada Lottery Update:- मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे  आताच्या घडीला खूप अवघड असून घरांच्या वाढत्या किमती या सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा नाहीत. त्यामुळे बऱ्याच जणांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते.

परंतु म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून या स्वप्नांना आकार देण्याचे महत्त्वपूर्ण काम राज्य सरकारच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे म्हाडाच्या मुंबई किंवा कोकण मंडळाच्या माध्यमातून मुंबई शहराकरिता सोडत काढण्यात येतात व या माध्यमातून घर मिळवण्यासाठी देखील बरेच जण प्रयत्न करतात.

अगदी याच पद्धतीने आता म्हाडाच्या पुणे विभागाच्या माध्यमातून देखील सोडतीसाठी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. जवळपास 4882 घरांसाठी ही जाहिरात म्हाडाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

परंतु म्हाडा पुणे विभागाच्या या लॉटरीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या लॉटरीमध्ये खूप स्वस्तात घरे मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या लेखात आपण म्हाडा पुणे विभागाकडून कोणत्या ठिकाणी स्वस्त घरे मिळणार आहेत व त्यांची किंमत किती आहे? त्याबद्दलची माहिती बघणार आहोत.

 म्हाडा पुणे विभागाच्या लॉटरीमध्ये या ठिकाणी मिळतील स्वस्त घरे

म्हाडाच्या पुणे विभागाच्या माध्यमातून एकूण 4882 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरे तसेच खाजगी शासकीय भागीदारीतील घरे व म्हाडा गृहनिर्माण योजना, 20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांचा समावेश करण्यात आलेला आहे.

यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेच्या माध्यमातून सर्वात स्वस्त घरांचा समावेश करण्यात आलेला असून हे गृहप्रकल्प अल्प उत्पन्न गटांकरीता प्रामुख्याने आहेत. यामध्ये सर्वे क्रमांक 1712( भाग ) दिवे पुरंदर येथे 17 घरांचा समावेश यामध्ये आहे

व या घरांची अंदाजे किंमत नऊ लाख 44 हजार आठशे रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणच्या घरांचे चटई क्षेत्रफळ पाहिले तर ते 29.40 चौरस मीटर इतके आहे. तसेच अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच ईडब्ल्यूएस करिता देखील या सोडतीत घरे उपलब्ध करून देण्यात आलेली असून

यामध्ये चाकण माळुंगे इंगळे फेस 2(PMAY) करिता या घरांची अंदाजित किंमत 13 लाख 61 हजार 895 रुपये असून याकरिता 32 घरे उपलब्ध आहेत व या घरांचे चटई क्षेत्रफळ 51.59 चौरस मीटर इतके आहे. येवलेवाडी येथे बारा घरे या योजनेत विक्रीसाठी उपलब्ध असून या घरांची अंदाजित किंमत 13 लाख 94 हजार 400 ते 15 लाख 81 हजार रुपयेपर्यंत असून या घरांचे चटई क्षेत्रफळ 43.65 ते 49.49 चौरस मीटर इतके आहे.

 म्हाडा पुणे विभागाच्या सोडतीचे वेळापत्रक

या सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी सात मार्च 2024 पासून सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज हे आठ मार्च 2024 दुपारी तीन वाजल्यापासून करता येत आहे. यामध्ये ऑनलाइन पेमेंट स्वीकृती देखील ८ मार्च 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे.

या सोडतीसाठी अर्ज नोंदणीची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 सायंकाळी पाच वाजेपर्यंत असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 रात्री अकरा वाजून 59 मिनिटापर्यंत असणार आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट हे 12 एप्रिल 2024 रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत करता येणार.

त्यानंतर सोडती करिता स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची यादी 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे व प्रत्यक्ष सोडत आठ मे 2024 सकाळी दहा वाजता गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, म्हाडा कार्यालय, पुणे येथे होणार आहे.