अहमदनगरच्या कलियुगी धनंजयाचीं नेकी ! कवडीमोल दरामुळे लोकांना मोफत वाटला कांदा; पण सरकार का बनतय गांधारीसमान अंध? मोठा सवाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सध्या राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. कांदा पिकासाठी झालेला उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांना भरून निघत नसल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात कांदा मात्र 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री होत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विकण्याऐवजी कांद्यात जनावरांना सोडल आहे. तर काहींनी कांदा पिकावर नागर फिरवला आहे.

अशातच अहमदनगर जिल्ह्यातील एका कलियुगी धनंजयाने बहु कष्टाने उत्पादित केलेला कांदा बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा विकण्यापेक्षा लोकांच्या मुखात जाईल या उदांत हेतूने मोफत कांदा वाटला आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या मौजे पिंपरणे येथील नवयुवक शेतकरी धनंजय थोरात यांनी आपल्या चार एकर शेत जमिनीमधील कांदा कवडीमोल दर मिळत असल्याने लोकांना फुकट वाटला आहे.

निश्चितच कांद्याला कमी दर मिळत असल्याने कांदा काढण्यासाठी, अन बाजारात नेण्यासाठी देखील परवडत नाहीये यामुळे धनंजय यांनी कांदा मोफत देऊन अगदी महाभारतातील धनंजय अर्थातच अर्जुनाप्रमाणे धर्माचे कार्य केले आहे. मात्र यानिमित्ताने मायबाप शासन महाभारतातील गांधारी समान अंध बनण्याचा का प्रयत्न करत आहे? हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. महाभारतात गांधारीने आपल्या पतीसाठी एक प्रकारे दृष्टी त्यागली होती मग मायबाप शासन कांद्याच्या मुद्द्यावरून कोणासाठी दृष्टी त्यागत आहे? कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत असतानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून धोरणात्मक निर्णय कोणासाठी घेतले जात नाहीत? कुणासाठी शासन गांधारी बनत आहे.

हाच मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील या तरुण शेतकऱ्याने आपल्या चार एकर क्षेत्रातील कांदा मोफत देऊन पुन्हा एकदा शेतकऱ्याला राजा असं का संबोधलं जातं याचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केल आहे. धनंजय यांनी पुढील पिकाला रान मोकळे व्हाव या अनुषंगाने आपल्या चार एकरावलील कांदापात शेळ्या-मेंढ्यांना दिली तर चांगला पोसलेला कांदा हा मोफत गावकऱ्यांना वाटला. मोफत कांदा मिळतोय म्हणून पिंपरणे गावासह जोर्वे, कनोली येथील ग्रामस्थांनी देखील कांदा नेण्यासाठी धनंजय यांचं शेत जवळ केलं.

धनंजय यांचे चार एकर शेत अवघ्या दोन दिवसात यामुळे मोकळं झालं असून त्यांना आता पुढील पीक पेरणीसाठी तयारी करावयाची आहे. खरं पाहता, कांदा पाच ते सहा रुपये किलो या भावात बाजारात विक्री होत आहे. अशा परिस्थितीत मजुरी, गाडीभाडे, हमाली, तोडाई व आडत यांचा खर्च भागवता-भागवताच लिलावात कांद्याला मिळालेले पैसे संपतात. अनेकदा शेतकऱ्यांना पदरमोड करून हा खर्च भागवावा लागतो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सोलापूर एपीएमसीमध्ये दहा पोती कांदा विकला.

या कांद्याच्या मोबदल्यात या शेतकऱ्याला सर्व खर्च वजा जाता दोन रुपयाचा धनादेश देण्यात आला आहे. यामुळे अशा कवडीमोल दरात कांदा विकण्यापेक्षा लोकांच्या मुखात गेलेलं चांगल असं म्हणत या कलियुगी धनंजयाने कांदा मोफत वाटून धर्माचेच काम केले आहे. मात्र, पदोपदी धर्माचे उदाहरण प्रस्तुत करणारे शासन शेतकऱ्यांचे हे हाल पाहून कांदा दर वाढीसाठी उपाययोजना करत धर्माचे काम केव्हा करतील? हा मोठा प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.