मोठी बातमी ! भारतात 2023 मध्ये होणार ‘या’ महामार्गांचे लोकार्पण ; महाराष्ट्रातील ‘या’ 1382 किमी अन 379 किमी लांबीच्या दोन प्रकल्पांचा आहे समावेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Expressway Launch In 2023 : केंद्र शासनाकडून सबंध भारतातील महामार्गांचे जाळे विस्तृत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संपूर्ण भारत वर्षात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या महामार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी भारतमाला परियोजना राबवली जात आहे.

या परियोजनाच्या माध्यमातून देशभरात अद्ययावत महामार्ग तयार केले जात आहेत. याकामी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. नुकतेच मंत्री महोदय यांनी भारतातील रस्ते आणि पायाभूत सुविधा 2024 पर्यंत अमेरिकेच्या मानांकनानुसार आणि त्या समतुल्य असतील असे प्रतिपादन देखील केले आहे.

विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या आधी झालेल्या कोणत्याही मंत्र्यांपैकी अधिक रस्ते बनवण्याचा विक्रम नावावर केला आहे. त्यांच्या कार्यकाळात सबंध भारत वर्षात मोठमोठे महामार्गांचे जाळे विकसित करण्यात आले आहे.

तसेच सद्यस्थितीला देशभरात काही मोठ्या महामार्गांचे कामे देखील प्रगतीपथावर आहेत. भविष्यात देखील त्यांनी या अनुषंगाने काही प्रकल्पासाठी काम सुरू केले आहे. यामुळे शहरा-शहरांमधील आणि राज्य-राज्यांमधील अंतर कमी होण्यास मदत होणार असून देशभरातील प्रवास जलद गतीने होणार आहे.

यामुळे देशातील दळणवळण व्यवस्था सक्षम होणार आहे. दरम्यान 2023 मध्ये भारतात अनेक नवीन एक्स्प्रेस वे बांधले जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण 2023 मध्ये पूर्ण होणारे टॉप पाच एक्सप्रेसवेची माहिती जाणून घेणार आहोत.

द्वारका एक्सप्रेस वे :- हा महामार्ग राजधानी दिल्लीसाठी मोठा फायद्याचा राहणार असून यामुळे राजधानीमधील वाहतूक कोंडी फुटणार आहे. हा पहिला शहरी उन्नत द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जात आहे. सध्या स्थितीला या महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा द्वारका एक्सप्रेसवे राजधानीच्या पश्चिम भागाला गुरुग्रामशी जोडणारा आहे. तसेच यामुळे राष्ट्रीय महामार्ग 8 म्हणजे NH8 वर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यास मदत करणार आहे. या द्रुतगती मार्गाची एकूण लांबी सुमारे 29 किमी राहणार असून हा 2023 च्या मध्यापर्यंत तयार होण्याची अपेक्षा प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे :- महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली यांना जोडणारा हा महामार्ग महाराष्ट्राच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. हा 1382 किलोमीटर लांबीचा महामार्ग दिल्लीला जवळ करण्यासाठी अति महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे मुंबईहून दिल्लीचा प्रवास जवळपास 12 तासांनी कमी होणार आहे. सद्यस्थितीला दिल्ली गाठण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागत असून या महामार्गामुळे हा कालावधी 12 तासांवर येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा महामार्ग आता आपल्या अंतिम टप्प्यात आहे आणि 2023 च्या पहिल्या तिमाहीत हा लोकांसाठी खुला होणार असल्याचा दावा केला जात आहे.

अहमदाबाद-धोलेरा एक्सप्रेस वे :- हा अहमदाबाद-धोलेरा एक्सप्रेसवे हा गुजरात राज्यातील एक अति महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे गुजरात राज्यातील विकासाला चालना मिळणार असल्याचा दावा शासनाकडून करण्यात आला आहे. गुजरात राज्यातील सर्वात मोठे शहर अहमदाबादला धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन (DSIR) शी जोडणारा हा एक केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाची एकूण लांबी सुमारे 110 किलोमीटर राहणार आहे. हा महामार्ग गुजरातमधील अनेक प्रमुख शहरांना जोडणार असून यामुळे गुजरात मधील दळणवळण व्यवस्था अजूनच मजबूत होणार आहे. हा मार्ग पूर्णपणे बांधून तयार झाल्यानंतर अहमदाबाद आणि डीएसआयआर दरम्यान प्रवास फक्त दोन तासांनी शक्य होणार असल्याचा दावा झाला आहे.

अमृतसर-जामनगर एक्स्प्रेस वे :- हा देखील देशातील एक महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे. या होऊ घातलेल्या महामार्गाची लांबी सुमारे 1,257 किमी राहणार आहे. हा एक्सप्रेसवे देखील सप्टेंबर 2023 पर्यंत तयार होईल अशी अपेक्षा शासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला अमृतसर आणि जामनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी 26 तासांचा कालावधी प्रवाशांना लागत आहे. मात्र या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर 13 तासांतच हा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. हा महामार्ग तीन ऑइल रिफायनरीज आणि दोन थर्मल पॉवर प्लांटला जोडणार असल्याने औद्योगिक दृष्ट्या या महामार्गाचे महत्त्व वाढत आहे.

मुंबई वडोदरा महामार्ग :- 2023 मध्ये लोकार्पण होणाऱ्या महामार्गाच्या यादीत या महामार्गाचा देखील समावेश आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे नंतर मुंबई वडोदरा महामार्ग हे दोन महामार्ग 2023 मध्ये तयार होणार असून महाराष्ट्रासाठी हे दोन्ही महामार्ग अति महत्त्वाचे आहेत. पश्चिम भारतातील दोन प्रमुख शहरे म्हणजेच मुंबई आणि वडोदरा यांना जोडणारा हा महामार्ग औद्योगिक दृष्ट्या अधिक फायद्याचा राहणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरात मधील एक प्रमुख आर्थिक केंद्र वडोदरा या शहरांना जोडण्यासाठी हा द्रुतगती मार्ग बांधला जात असल्याने महाराष्ट्र समवेतच गुजरात मधील उद्योग जगताला याचा फायदा होणार आहे. या एक्स्प्रेस वेची एकूण लांबी अंदाजे 379 किलोमीटर असेल आणि तो अनेक प्रमुख शहरांमधून प्रस्तावित राहणार आहे. या होऊ घातलेल्या महामार्गामुळे या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ केवळ सहा तासांवर येण्याची अपेक्षा आहे. निश्चितच या महामार्गामुळे देखील महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था अजूनच सक्षम होणार आहे.