नादखुळा ! 72 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा शेतीत भन्नाट प्रयोग; ‘या’ पिकाच्या शेतीतून एका एकरात मिळवले 3 लाखाचे उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer : अलीकडे शेती व्यवसायात मोठा बदल पहावयास मिळत आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पिकांऐवजी फळबाग लागवडीकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. याच्या फलस्वरूप राज्यातील शेतकऱ्यांना आता शेती व्यवसायातून चांगली कमाई होत आहे. लातूर जिल्ह्यातही एका प्रयोगशील शेतकऱ्याने असाच एक भन्नाट प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे वयाच्या 72 व्या वर्षी या शेतकऱ्याने शेतीमध्ये बदल करत पेरू या फळ पिकाची लागवड केली.

पारंपारिक पिकांच्या शेतीत कायमच तोटा सहन करावा लागत असल्याने या शेतकऱ्याने पेरूची लागवड केली आणि अवघ्या एका एकरातून तीन लाखांची कमाई करत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे. जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील खुर्दळी या गावातील मैनोदीन चौधरी यांनी एका एकरात पेरूची लागवड करून तीन लाखांची कमाई करण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या चौधरी यांची परिसरात चांगली चर्चा पाहायला मिळत आहे.

चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या एक एकर जमिनीत पेरूची 100 रोपे लावली आहेत. विशेष म्हणजे पेंरुबागेत त्यांनी आंतरपीक देखील घेतले, जोपर्यंत पेरूपासून उत्पादन मिळत नाही तोपर्यंत आंतरपीक घेण्याच त्यांनी ठरवलं. हा निर्णय त्यांच्यासाठी मोठा फायदेशीर ठरला, आंतर पिकातून देखील त्यांना चांगली कमाई झाली. त्यामुळे बाग व्यवस्थापनासाठी आलेला खर्च भरून काढता येणे त्यांना सहज शक्य झालं.

दरम्यान आता पेरू बागेतून उत्पादन त्यांना मिळाले आहे. यावर्षी चांगली फळधारणा झाली असल्याने विक्रमी उत्पादन एक एकर बागेतून त्यांना मिळाले आहे. विक्रमी उत्पादन मिळाले शिवाय पेरूची विक्री करताना त्यांनी थेट व्यापाऱ्याला विक्री न करता स्वतः बाजारात जाऊन थेट ग्राहकांना आपला माल विकला आहे. यामुळे त्यांना अधिकचा नफा मिळाला.

एका एकरातून जवळपास त्यांनी तीन लाखांची कमाई केली. असं म्हणतात की पिकत तिथे विकत नाही, मात्र चौधरी यांनी ही म्हण व्यर्थ ठरवली असून शेतकरी आता पिकवतो पण आणि स्वतः विकतो पण हे जगाला सिद्ध करून दाखवल आहे.

एकीकडे तरुण शेतकरी बांधव नैसर्गिक आपत्तीमुळे आणि शासनाच्या काही कुचकामी धोरणामुळे शेतीतून अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याचं गाऱ्हाणं मांडत आहे. निश्चितच शेतकऱ्यांच्या पुढ्यात नानाविध अशा अडचणी आहेत. परंतु जर अडचणींवर मात करण्याची धम्मक, त्यासाठीच योग्य नियोजन, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कष्ट करण्याची उमेद असेल तर कितीही संकट आली तरी देखील त्यावर यशस्वी मात करत अगदी वयाच्या 72 व्या वर्षी देखील शेतीतून लाखोंची कमाई केली जाऊ शकते हेच चौधरी यांच्या या नाविन्यपूर्ण प्रयोगातून आज सिद्ध होत आहे.