‘त्या’ बेवारस बॅगच्या मालकाचे मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन; गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- संशयीतरित्या बॅग ठेऊन आणि दारू पिऊन लोकांसोबत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणार्‍या लष्करी कर्मचार्‍याविरूध्द कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कृष्णा अश्रुबा शेंडगे (वय 42 रा. कासवा ता. आष्टी जि. बीड) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याने दारू पिऊन लोकांसोबत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केले म्हणून त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 85 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार अभय कदम यांनी फिर्याद दिली आहे. पुणे रोडवरील उत्पादन शुल्कच्या गेटसमोर एक व्यक्ती दारू पिऊन बेधुंद होऊन येणार्‍या-जाणार्‍या लोकांसोबत गैरवर्तन करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.

त्यांनी गस्ती पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, राजु शेख, कदम यांना त्याठिकाणी पाठविले. तेथे एक संशयीत बॅग मिळून आली.

यामुळे बॉम्बशोधक आणि नाशक पथक दाखल झाले. त्यांच्याकडे असणार्‍या गॅजेटने बॅगेची बाहेरून तपासणी केली असता त्यातून रेड सिग्नल मिळाला.

त्यामुळे पोलीस सावध झाले. त्यांनी ही बॅग घटनास्थळी न उघडता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नेऊन उघडली. बॅगेत काहीही स्फोटके किंवा धोकादायक आढळून आली नाही.

दरम्यान ही बॅग शेंडगे याची असल्याने त्याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची जिल्हा शासकीय रूग्णालयात तपासणी केली असता त्याने मद्य प्राशान केल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.