‘युवक प्रतिष्ठान ही काळा पैसा पांढरा करणारी संस्था, शिपायांच्या घरीही सोमय्या गेले”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातले आरोपसत्र काही पूर्णविराम घेताना दिसत नाही. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा नवीन आरोप केले आहेत.

संजय राऊत आरोप करताना म्हणाले, शेअर मार्केटमध्ये 5600 कोटीचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याप्रकरणी मोतीलाल ओसवाल (motilal oswal) ही कंपनी ईडीच्या फेऱ्यात आली होती.

या कंपनीची चौकशी व्हावी म्हणून सोमय्यांनी आकांडतांडव केलं होतं. या कंपनीच्या कार्यालयातही सोमय्या गेले होते. तसेच कंपनीच्या शिपायांच्या घरीही सोमय्या गेले होते.

त्यानंतर या कंपनीकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला (Youth Foundation) लाखोंची देणगी कशी मिळाली? असा सवाल करतानाच ईडीने या कंपनीची चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

हा ईडीच्या अख्त्यारीत प्रश्न आहे. त्यामुळे ईडीने चौकशी केली पाहिजे. आम्ही ईडीला (ED) याबाबतची सर्व माहिती देऊ, असं सांगतानाच सोमय्याची युवक प्रतिष्ठान ही काळा पैसा पांढरा करणारी संस्था आहे असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

किरीट सोमय्या हे स्वत:ला भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे प्रमुख आधारस्तंभ मानतात. मोतीलाल ओसवाल आणि कंपनी ही शेअर बाजारातील एक मोठी कंपनी आहे. एनसीएलमध्ये 5600 कोटींचा घोटाळा झाला होता.

त्यात या कंपनीचं नाव आलं. या कंपनीची चौकशी करा म्हणून सोमय्याने आकांडतांडव केलं. स्वत: त्यांच्या कार्यालयात गेले. त्यांच्या शिपयांच्या घरी गेले. त्यांच्या युवक प्रतिष्ठानला त्यानंतर मोतीलाल ओसवालकडून लाखोंच्या देणगी दिल्या गेल्या.

सध्या मला त्याबाबतचे दोन चेक मला मिळाले आहेत. तुम्ही भ्रष्टाचाराच्या कोणत्या लढाया लढत आहात? या घोटाळ्याशी तुमचा संबंध आहे असं आम्ही म्हटलं तर तुमचं काय उत्तर आहे? असा खोचक प्रश्नही सोमय्यांना राऊत यांनी विचारला आहे.

पुढे राऊत म्हणाले, गेल्या तीन चार दिवसांपासून मी एक प्रकरण देतोय. त्यावर एकही खुलासा नाही. युवक प्रतिष्ठान हा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा उद्योग आहे.

मुंबईतील बिल्डर आणि व्यापारी विशेषत: ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या कारवाया आहेत अशांना ब्लॅकमेल करून सोमय्या लाखो, कोट्यवधी रुपये गोळा करतात.

युवक प्रतिष्ठानच्या नावाने चेक घेतात. कॅशही घेतात असं सांगतात. याची चौकशी होणार आहे. धर्मादाय आयुक्त आणि आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी होणार आहे. त्यानंतर याची माहिती आम्ही ईडीला देणार आहोत.

कारण यात ईडीचा थेट संबंध आहे. ईडीने कारवाया केलेल्या कंपन्यांकडून त्याने पैसे कसे घेतले. त्याच्या लिंक्स काय आहेत. किरीट सोमय्यांचा नेहमी विचारतात ना, क्या संबंध है, कहाँ से आया पैसा? तसंच आम्ही विचारत आहोत, तुमचा संबंध काय? कुठून आला पैसा? असे प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केले आहेत.