Maharashtra Famous Picnic Spot : महाराष्ट्रात असे असंख्य पिकनिक स्पॉट आहेत जेथे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ असते. पिकनिक साठी महाराष्ट्रातील कोकण हा विभाग सर्वात भारी आहे. येथील समुद्र, निसर्ग, समुद्रकिनारा सार कसं एक नंबर आहे. यामुळे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा अशा तीनही ऋतूंमध्ये कोकणात पर्यटकांची रेलचेल असते.
जगात भारी असे कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात यात शंकाच नाही. मात्र आज आपण अशा एका पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेणार आहोत जिथे समुद्र नाहीये, मात्र येथे गेल्यानंतर तुम्हाला समुद्राचा फील येणार आहे.
समुद्रकिनाऱ्यावर चालताना जशी मजा येते तशीच मजा या ठिकाणी येते. आता नक्कीच तुम्हाला या पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया महाराष्ट्रातील या जगावेगळ्या पिकनिक स्पॉटची माहिती.
कुठे आहे हे ठिकाण
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे हे ठिकाण आहे. कोल्हापुरातील रंकाळा तलाव या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला समुद्र नसतानाही समुद्रासारखा फील येणार आहे. येथे चालताना अगदी चौपाटी सारखा भास होतो. यामुळे जर तुम्हीही नजीकच्या काळात कुठे पर्यटनासाठी बाहेर पडण्याचा तयारीत असाल तर तुम्ही रंकाळा तलावाला नक्कीच भेट दिली पाहिजे.
येथे गेलात तर तुम्हाला परत माघारी फिरावेसे वाटणार नाही. या ठिकाणची सुंदरता आणि शांत वातावरण तुमच्या मनाला प्रसन्न करणार आहे. खरे तर श्रीक्षेत्र कोल्हापूर येथे करवीर निवासीनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच अधिक आहे.
कोल्हापूरातील महालक्ष्मी मातेचे मंदिर जगप्रसिद्ध आहे. येथे दररोज हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळते. सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये कोल्हापूर येथे महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असते. दरम्यान या महालक्ष्मी मातेच्या मंदिरानंतर कोल्हापुरातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाण म्हणून रंकाळा तलावाची ओळख आहे.
हा तलाव रंकाळा चौपाटी म्हणूनही ओळखला जातो. कारण की येथे तुम्ही चाललात तर चौपाटीवर चालल्यासारखेच वाटते. जर तुम्ही कधी कोल्हापूरला गेलात तर महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या रंकाळा तलावाला नक्कीच भेट द्या.
हा तलाव शहराच्या अगदी मध्यभागी आहे. या तलावात राजघाट व मराठा घाट या दोन घाटातून पाणी येते. असं म्हणतात की हा तलाव महालक्ष्मी मातेच्या कृपेने तयार झाला आहे. कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात या तलावाचे विकास कामे पूर्ण झालीत.
हा तलाव तब्बल अडीच मैल दुरवर पसरलेला आहे. या तलावाची खोली 35 फूट पर्यंत असल्याचे सांगितले जाते. या तलावाचे सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. तलावाच्या आजूबाजूला नारळाची उंचच-उंच झाडे आहेत. येथे पर्यटकांना बोटिंग देखील करता येते. येथे खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील लागलेले असतात.
तुम्ही जर एसटी बसने जात असाल तर कोल्हापूर बस स्थानकातून तुम्हाला रंकाळा तलावापर्यंत बस उपलब्ध होणार आहे. या ठिकाणापासून जवळचे रेल्वे स्थानक कोल्हापूर हे आहे. जर तुम्ही एका दिवसाच्या पिकनिकसाठी कुठे ट्रिप काढणार असाल तर तुमच्यासाठी कोल्हापूरची ट्रिप फायदेशीर ठरणार आहे. कोल्हापूर ट्रिप मध्ये तुम्ही महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन रंकाळा तलाव व्हिजिट करू शकता.