सुजय विखेंच्या रेमडेसिवीर प्रकरणामुळे शरद पवार, रोहित पवार ही अडचणीत !

 

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शनाचा साठा व वाटप केल्याप्रकरणात अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्याविरोधात हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत, याचिकाकर्त्यांनी दुरुस्ती अर्ज दाखल केला.

एका बातमीच्या आधारे राज्यात विविध ठिकाणी काही राजकीय नेत्यांनी, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व आमदार रोहित पवार माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अमरिश पटेल यांनीही कायदेशीर अधिकार नसताना रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केल्याचा आरोप केला आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

यामुळे सुजय विखे यांच्यासह खासदार शरद पवार आणि रोहित पवार ही अडचणीत सापडले आहेत. इंजेक्शन नियमाप्रमाणे खरेदी केले आणि त्यातील १२०० इंजेक्शन हे चंदीगड येथून खासगी विमानाने शिर्डी येथे आणल्याचा युक्तिवाद खासदार सुजय विखे यांच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला.

डॉ. विखे आणि त्यांच्या रुग्णालयाला १७०० रेमडेसिवीर इंजेक्शन साठा खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. तशी रीतसर नोंद जिल्हा शल्यचिकित्सकांकडे करण्यात आली होती; परंतु इंजेक्शनचा हा साठा खासगी विमानाने शिर्डी येथे आणण्याबाबत आपल्याला काहीच कल्पना नव्हती, असे शपथपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

सोमवारी(दि.३) सुनावणी झाली असता, प्रधान सचिव, गृह विभाग आणि नगरचे पोलीस अधीक्षक यांनी हायकोर्टाच्या आदेशानुसार, रेमडेसिवीर इंजेक्शनबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला. न्या. आर. व्ही घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी अहवाल रेकॉर्डवर घेतले.

फौजदारी याचिकेवर ५ मे रोजी पुढील सुनावणी होईल. डॉ. विखे यांनी दहा हजार इंजेक्शन विनापरवाना आणले. शिर्डी विमानतळावर हा साठा आणण्यात आला. पण इंजेक्शन कोठून आणले त्याची माहिती दिली नाही. काही इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालय व राहता येथील सरकारी दवाखान्याला वाटप केले.

सदर इंजेक्शनचा साठा भेसळमुक्त/ शुद्ध आहे, असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही. एवढा मोठा इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला, याचा हिशेब नाही, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी ॲड. सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली आहे.

खा. विखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा तत्काळ शासनाने जप्त करावा व गरजू रुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत समन्याय पद्धतीने वाटप करावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ॲड. प्रज्ञा तळेकर, ॲड. अजिंक्य काळे, ॲड. उमाकांत आवटे व ॲड. राजेश मेवारा हे याचिकाकर्त्यांच्या वतीने काम पाहत आहेत.

तर शासनाच्या वतीने ॲड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्याची गोपनीयता पाळण्यासाठी शासकीय अधिकारी खोटी कागदपत्रे तयार करत आहेत. एका बाजूने शासकीय यंत्रणा व डॉ. विखे चंदीगढ येथून शिर्डी येथे खासगी विमानाने आणलेला इंजेक्शनचा साठा एकाच कंपनीचा असल्याचे भासवत आहेत.

पण दुसऱ्या बाजूने त्यांच्यामार्फत तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या इंजेक्शनचे वितरण करण्यात येत असल्याने त्यांच्याकडे १७०० रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्याव्यतिरिक्त अजून साठा असल्याचे मत सोमवारी याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|