Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्रात २ हजार १०९ कृषिसेवक पदांची भरती !

Ahmednagarlive24
Published:

 

Krushi Sevak Bharti 2023 :- कृषी विभागात शासनाने तब्बल साडेतीन वर्षांनंतर कृषिसेवक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आठही विभागांत ही पदभरती करण्याचे आदेश कृषी विभागाने काढले आहेत. यामध्ये राज्यातील २ हजार १०९ पदांसाठी ही भरती होणार असून, येत्या आठ ते दहा दिवसांत अर्जप्रक्रियेची सविस्तर माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

कृषी विभागात क्षेत्रीय स्तरावर दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ‘क’ संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे कृषिसेवक म्हणून सरळसेवेने भरण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात कृषिसेवकांची तब्बल २ हजार ६३८ पदे रिक्त आहेत.

विभागनिहाय रिक्त पदे व पदभरतीची संख्या

विभाग रिक्त पदे पदसंख्या
ठाणे ३६८ २९४
पुणे २३५ १८८
कोल्हापूर ३१३ २५०
नाशिक ४२० ३३६
अमरावती २८४ २२७
औरंगाबाद २४५ १९६
लातूर २१३ १७०
नागपूर ५६० ४४८
एकूण २६३८ २१०९

त्यापैकी ८० टक्के म्हणजेच जवळपास हजार १०९ पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ही पदे निश्चित वेतनावर भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

या पदांवरील भरतीकरिता ऑनलाइन परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येतील. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याबाबतच्या सूचना, अर्ज करण्याचा कालावधी, ऑनलाइन परीक्षेची तारीख याबाबतची स्वतंत्रपणे माहिती विभागाच्या संकेतस्थळावर दिली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया आयबीपीएस या एजन्सीद्वारे राबवण्यात आली आहे.

अनुसूचित क्षेत्राबाहेरील आणि क्षेत्रातील अशा दोन्ही प्रवर्गातील ही भरती होणार आहे. कृषिसेवक पदासाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादा ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे एवढी निश्चित करण्यात आली आहे.

या पदासाठी प्रति महिना १६ हजार रुपये एवढे वेतन निश्चित करण्यात आले आहे. तर विद्यापीठाची कृषी विषयामधील पदविका, पदवी ही शैक्षणिक अर्हता ठरवण्यात आली आहे. परीक्षेचे स्वरूप हे २०० गुणांचे १४० वस्तुनिष्ठ आधारित प्रश्न असणार आहेत.

यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, कृषी विषय यावर आधारित प्रश्न असतील. भरतीसाठी मागासवर्गीय उमेदवारांना ९०० रुपये, तर अमागासवर्गीय उमेदवारांसाठी १ हजार रुपये परीक्षा शुल्क ठरवले आहे. यापूर्वी २०१९ मध्ये १६०० पदांची भरती कृषी विभागाने केली होती.

त्यानंतर आता पुन्हा भरती करण्यात येणार आहे. यात नागपूर विभागात सर्वाधिक ४४८ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. तर लातूर विभागात सर्वात कमी म्हणजेच १७० पदे भरण्यात येणार आहेत. तलाठी पदानंतर कृषिसेवक पदांची आतापर्यंत सर्वात मोठी पदभरती मानली जात आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.