खरीप पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळावी

Ahmednagarlive24
Published:

 

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- कोपरगाव शहर | चालू वर्षी मान्सून उशिरा आल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पेरण्यांना वेळ लागला. त्यामुळे त्यांना मुदतीत पीक विमा भरता आला नाही.

शासनाने खरीप पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.

त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा पर्जन्यमान उशिरा झाले. सुरुवातीला मृग नक्षत्राचा पाऊस जेमतेम झाला. त्यात अनेक शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडून पडले. त्यात खरीप पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे.

या मुदतीत शेतकऱ्यांना रक्कम भरता आले की नाही, तेव्हा शासनाने खरीप पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी. जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले.